अहिल्यानगर ( दि. 8 एप्रिल):-बहुविध कारणांनी संधीवंचित आणि उपेक्षित असलेल्या मुली – महिलांना पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात रोजगार शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र सक्षमा प्रकल्प स्नेहालय संस्थेने उभारला. सक्षमाचे लोकार्पण येत्या शुक्रवारी,11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजिण्यात आले असल्याचे स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे आणि खजिनदार गीता कौर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, पद्मश्री पोपटराव पवार , ज्येष्ठ समाजसेविका सुधा कारखानीस , देसरडा – भंडारी प्रोफेशनल अकादमीचे संस्थापक सीए संदीप देसरडा हे यावेळी निमंत्रित उद्घाटक आहेत. द न्यू इंडिया एश्शुरन्स कंपनीने सक्षमाच्या निर्मितीसाठी आर्थिक सहयोग दिला.या कंपनीचे उपमुख्य व्यवस्थापक एच. बी. अरुण ,विभागीय व्यवस्थापक प्रेमचंद मोरे , अहिल्यानगरचे वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक भगवान पवार , नरेंद्र लोहाडे, यावेळी उपस्थित राहतील. सक्षमाचे बांधकाम जेएमआर बिल्डकॉन कंपनीचे अभियंता ओंकार म्हसे यांनी केले .

वास्तू आराखडा अश्वत्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंखे यांनी केला आहे.सक्षमा प्रकल्पात बालमाता, बालवेश्या, अत्याचारित महिला, झोपडपट्टी – आदिवासी आणि ग्रामीण भागातील अल्पशिक्षित गरीब व गरजू मुली , देह व्यापारातून मुक्त झालेल्या महिला, विविध अनाथालयांमधील 18 वर्षे पूर्ण झालेली बालके यांच्यासाठी 3 महिन्यांचा रुग्ण सहाय्यक किंवा बेडसाईड असिस्टंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रोजगार शिक्षणाचे अन्य विविध उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. हे सर्व उपक्रम मोफत आणि परगावच्या मुला मुलींसाठी निवासी स्वरूपाचे आहेत.परिचारिका सहाय्यक अभ्यासक्रमाची जबाबदारी जेष्ठ परिचर्या प्रशिक्षक स्वराज्य श्री राजेंद्र कुलकर्णी यांनी स्वीकारली आहे.
सॉफ्ट स्किल आणि विविध अल्पमुदतीचा रोजगार कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची जबाबदारी स्नेहालयाच्या कौशल्य विकास केंद्रास देण्यात आली आहे.रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमात 30 तर अन्य अभ्यासक्रमात 70 लाभार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
नूतनीकृत स्नेहांकूर
याच वेळी नूतनीकरण झालेल्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या वास्तूचेही उद्घाटन आणि 3 बालकांचे दत्तक विधान होईल.स्नेहांकुर आणि सक्षमा हे दोन्ही प्रकल्प केडगाव मधील मॅकडोनाल्ड मागे साकारण्यात आले आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून येथील प्रवेश प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश तत्त्वावर उपलब्ध असल्याचे सक्षमा केंद्राने स्पष्ट केले आहे.येथील प्रवेशाच्या संदर्भात माहितीसाठी 9011026495 येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे.
संगीता सानप (स्नेहालय जनसंपर्क अधिकारी) 9011020178
