एकल महिलेला ‘चविका चहा’ स्टॉल भेट;आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर नगर-मनमाड रोडवरील सावेडी येथे रक्षितम अग्रोनिक्स प्रा.लि. यांच्या ‘आशा महिला स्वयंसिद्धा योजना’ अंतर्गत आणि मानव सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरातील एका एकल लाभार्थी महिलेला ‘चविका चहा’चा संपूर्ण स्टॉल सुरु करून देण्यात आला आहे. या चहा स्टॉलचे उद्घाटन ५ जून रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षितम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या या पुढाकारामुळे सदर महिलेला दरमहा २५ ते ३० हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. कंपनीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला असून, विशेषतः एकल, निराधार आणि विधवा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना हाती घेतली आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास २५ एकल महिलांना अशाप्रकारे मदत करण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक महिलांचा आधार हरपला असल्याने, अनुशिल मेढे यांच्या माध्यमातून या एकल महिलांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबांचे जीवनमान सुधारावे आणि पाल्यांचे शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावे, अशी भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली.यावेळी लाभार्थी महिला दिपाली अरविंद कोंड्रा यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक कुमार वाकळे, दत्ता गाडळकर, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व उद्योजक अमोल घोलप, कंपनीच्या कार्यकारी संचालिका जयादेवी मेढे, सीईओ अनुशिल मेढे, कंपनीचे मॅनेजर प्रमोद पालवे,विवेक दसरे, मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रकाश तांबडे, सचिव भिमाजी रूर्दाक्ष, राजेंद्र गिरी, महिला सचिव शितल ढवळे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्ण तरटे, नलिनी नागवडे, देविदास कदम, अजित कुऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…