मानसिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार.. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची मागणी..संस्थाचालक व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-मांडकी येथील चैतन्य कानिफनाथ मानसिक अक्षमता असलेल्या आश्रम शाळेत मानसिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून या विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने कडक भूमिका घेतली आहे.या प्रकरणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी चिकलठाणा पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित संस्थाचालक व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा, अशी ठाम मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, हा प्रकार बाल हक्क कायदा तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा (RPwD Act, 2016) यांचे उघड उल्लंघन असून, दोषींवर भा.दं.वि. कलम 323, 325 व बाल न्याय कायदा कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच,सदर शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी व पीडित विद्यार्थ्यांना मानसिक आधारासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशीही मागणी पक्षाकडून करण्यात आली.या वेळी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, युवा शहर कार्याध्यक्ष जहीर शेख, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे व जाकेर जे.के. आदी उपस्थित होते.
