जिल्ह्यात खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांचा भांडाफोड..! झेडपीचे १५ कर्मचारी निलंबित ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी व सवलती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून,वैद्यकीय पडताळणीत अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या १५ कर्मचार्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय या प्रकरणातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही संबंधित गटविकास अधिकार्यांना देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील दिव्यांग कर्मचार्यांची वैद्यकीय पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने तालुकानिहाय शिबिरे आयोजित करून कर्मचार्यांची तपासणी केली. जिल्हा परिषदेत एकूण ५४५ दिव्यांग कर्मचारी असल्याची नोंद आहे.प्राथमिक तपासणीत यापैकी सुमारे १८० कर्मचारी दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित कर्मचार्यांची सखोल वैद्यकीय पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली.या पडताळणीत १८ कर्मचार्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हापरिषद प्रशासनाकडे पाठवला.त्यानंतर संबंधित कर्मचार्यांना नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला.खुलासा समाधानकारक नसल्यामुळे १५ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.दरम्यान,या प्रकरणातील ८ कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. एका कर्मचार्याचा खुलासा मान्य करण्यात आला आहे,तर दोन जणांची पुन्हा वैद्यकीय पडताळणी केली जात आहे. तसेच पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या १९ कर्मचार्यांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान,काही वर्षांपूर्वीही जिल्ह्यात खोट्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे बदली व शासकीय सवलती मिळवल्याप्रकरणी ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पुन्हा १५ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, संशयित प्रमाणपत्रांची तपासणी अजूनही सुरू असून अजून ५९ कर्मचार्यांचा अंतिम निकाल बाकी आहे.त्यामुळे आगामी काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.निलंबित कर्मचार्यांमध्ये ११ शिक्षक, ३ परिचर आणि १ आरोग्य सेवकाचा समावेश असून त्यांच्यावर नियमांनुसार पुढील विभागीय चौकशी होणार आहे.
निलंबित कर्मचारी :
समाधान घुगे,सुनील वाघ, प्रभाकर चोखंडे, दत्तात्रय फपाळे,वामन घाटपांडे,अतुल सातपुते,मंदा शिंदे,संगीता कदम, संजयकुमार बडे, वर्षा अकोलकर, पुष्पलता खेडकर, सतीश लगड, सागर मोरे, विनायककुमार वाडेकर आणि संतोष लष्करे.
