जुन्या मनपा सभागृहाची अवस्था पाहून उपमहापौर धनंजय जाधव भावुक..ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेणार..तेथील स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना केल्या सूचना
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जुन्या मनपा कार्यालयाला उपमहापौर ॲड. धनंजयभैय्या जाधव यांनी भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली.यावेळी त्यांनी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज,नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती तसेच विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.उपमहापौर जाधव यांनी संबंधित विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी,आवश्यक सुविधा तसेच नागरिकांना सेवा देताना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी कर्मचाऱ्यांनी काही प्रशासकीय अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीदरम्यान उपमहापौरांनी कार्यालय परिसरातील स्वच्छतेचाही आढावा घेतला. काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता करण्याच्या तसेच परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.दररोज मोठ्या संख्येने नागरिक या कार्यालयात विविध कामांसाठी येत असल्याने परिसर स्वच्छ,नीटनेटका आणि सुस्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यानंतर उपमहापौर जाधव यांनी जुने मनपा सभागृहाचीही पाहणी केली. काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत हे ऐतिहासिक सभागृह जळून खाक झाले असून सध्या त्याची झालेली अवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली.या ठिकाणी उभे राहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी भावना व्यक्त करताना उपमहापौर जाधव म्हणाले की, “लहानपणी मी माझे वडील स्व.कृष्णाभाऊ जाधव यांच्यासोबत या सभागृहात आलो होतो.त्या काळात या सभागृहात अरुणकाका जगताप,शंकरराव घुले,अभयतात्या आगरकर हे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर माझे वडील स्व.कृष्णाभाऊ जाधव हे उपनगराध्यक्ष होते.त्या वेळी सभागृहात अनेक मान्यवरांची तेलचित्रे लावलेली होती.आज त्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहून मनाला वेदना होतात.”या ऐतिहासिक सभागृहाचे जतन करणे अत्यंत गरजेचे असून येथील तेलचित्रे आणि ऐतिहासिक वारसा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपमहापौरांच्या या भेटीमुळे जुने मनपा कार्यालय आणि सभागृहाच्या जतनाबाबत सकारात्मक पावले उचलली जातील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
