Crime..जमिनीच्या पैशांसाठी सासऱ्याचा खून… प्रेयसीचाही जीव घेतला.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुहेरी खून प्रकरण आणले उघड..जावई,मुलगा व सुन मुख्य सूत्रधार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील मिरजगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका बेपत्ता व्यक्तीच्या तपासातून दुहेरी खुनाचा थरारक उलगडा झाला आहे.सासऱ्याचा खून करून मृतदेह जाळून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तसेच अकोला जिल्ह्यात प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना जेरबंद केले आहे.या प्रकरणात जावई, मुलगा आणि सुन हे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.मिरजगाव पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक 06/2026 अन्वये श्री.आकाश बापू गाढवे (वय 26,व्यवसाय शेती,रा.चिंचोली रमजान,ता. कर्जत,जि.अहिल्यानगर) यांनी दिनांक 5 मार्च 2026 रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांचे वडील बापू आनंदा गाढवे (वय 60, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत) हे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

मिसिंग व्यक्तीचा शोध लागत नसल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे,पोलीस अंमलदार फुरकान शेख,दिपक घाटकर,भिमराज खर्से,राहुल डोके,शामसुंदर जाधव,सुनिल मालणकर,प्रशांत राठोड,सतिष भवर,महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे,सुवर्णा गोडसे, चालक भगवान दुर्योधन धुळे त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.तपासा दरम्यान नातेवाईकांकडे चौकशी करताना तक्रारदार आकाश बापू गाढवे याच्याबाबत संशय निर्माण झाला.सखोल चौकशीत त्याने सुनिल रामदास राठोड व त्याच्या साथीदारांनी घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सुनिल रामदास राठोड (वय 37, रा. नानासाहेब पातुर, ता. पातुर, जि. अकोला, हल्ली रा. आंबेठाण रोड, चाकण, पुणे) याचा माग काढला.तो शेगाव येथील खळवाडी परिसरात मित्र सचिन सारवान यांच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या पायाला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.पोलिसांच्या चौकशीत आरोपी सुनिल रामदास राठोड याने धक्कादायक कबुली दिली. त्याने सांगितले की,तो तसेच आकाश बापू गाढवे,पायल उर्फ आकांक्षा आकाश गाढवे (दोन्ही रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर),प्रथमेश उर्फ भावेश दिगंबर चांदुरकर (फरार),अमोल भिकाजी लाटकर (फरार) (दोन्ही रा. पुनोती, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांनी मिळून बापू आनंदा गाढवे यांच्या शेतजमिनीच्या पैशांवरून कट रचला. मयत शेतजमीन विकण्यास तयार नसल्याने दि.4 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेएक ते दोनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात उशी तोंडावर ठेवून व गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर घराजवळ लाकडे गोळा करून डिझेल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.तपासादरम्यान आरोपी आकाश बापू गाढवे यालाही ताब्यात घेण्यात आले असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
दरम्यान, आरोपी सुनिल रामदास राठोड याने आणखी एका खुनाची कबुली दिली. त्याचे शितल लिंबाजी सोंगेवाड (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा खून करून तिचा मृतदेह अकोला जिल्ह्यातील धनेगाव परिसरात अर्धवट जाळून टाकल्याचे त्याने सांगितले.या कबुली जबाबावरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 574/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक पांडुरंग मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 87/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे करत आहे.
