ऑपरेशन शोध मध्ये अहिल्यानगर पोलिसांची मोठी कामगिरी..तब्बल ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा शोध..राज्यस्तरीय मोहिमेत जिल्ह्याचा दमदार परफॉर्मन्स
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या “राज्यस्तरीय ऑपरेशन शोध” या विशेष मोहिमेत अहिल्यानगर पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ४५४ बेपत्ता महिला व बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.महिला व बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी तसेच बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही मोहीम दि. ०६/०२/२०२६ ते २३/०३/२०२६ या कालावधीत राबविण्यात आली.पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे,विशेष पथके तसेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.
या मोहिमेत एकूण ४५४ व्यक्तींचा शोध घेण्यात आला, त्यामध्ये
३८० महिला
६० मुले (जिल्ह्याबाहेर सापडलेल्यांचा समावेश)
१४ मुली
यांचा समावेश आहे. शोध लागल्यानंतर सर्व महिला व बालकांना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.या यशामागे पोलिसांनी केलेले नियोजनबद्ध काम, गोपनीय माहिती संकलन, व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांशी साधलेला समन्वय महत्त्वाचा ठरला. विशेष पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून आणि तपास मोहीम राबवून ही कामगिरी साध्य केली.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बेपत्ता महिला व बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, जेणेकरून अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविता येतील.अहिल्यानगर पोलिसांची ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, अनेक कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणारी आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली आहे.
