Crime..स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गॅस टंचाईत काळा बाजाराने धरला जोर..! ३ टॅंकरमधून बेकायदेशीर रिफिलिंगचा काळाबाजार.. तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कामरगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ४ आरोपींना अटक केली असून तब्बल २,०१,०९,६२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.दि. २३ मार्च २०२६ रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकातील अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे-अहिल्यानगर रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवारात ३ गॅस टॅंकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू आहे.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. छाप्यात एच.पी. कंपनीच्या ३ गॅस टॅंकरमधून भारत गॅसच्या व्यावसायिक टाक्यांमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग सुरू असल्याचे उघड झाले.या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:सचिन आबा बोधले (वय ३१, रा. दहिवडी, ता. तुळजापूर, जि. धाराशीव),माणिक बालाजी गुट्टे (वय ३२, रा. दैठणे, ता. परळी, जि. बीड),उल्हास जीवन कवडे (वय ३२, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशीव),अमृत बाळासाहेब ठोकळ (वय ३३, रा. कामरगाव, ता. जि. अहिल्यानगर) चौकशीत आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यांनी केवळ आर्थिक फायद्यासाठी जुगाड पद्धतीने गॅस टॅंकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त केला:५७.२०० टन एच.पी. गॅस (₹३०,४८,५२८),३ एच.पी. गॅस टॅंकर (₹१,६५,००,०००),भारत गॅसचे २ भरलेले व १८ रिकामे सिलेंडर (₹६०,०००),अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (₹५,००,०००),गॅस रिफिलिंगसाठी वापरलेले साहित्य अशा प्रकारे एकूण ₹२,०१,०९,६२८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही रिफिलिंग प्रक्रिया अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू होती. ज्वलनशील पदार्थ हाताळताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. २३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७, एलपीजी (पुरवठा व वितरण) आदेश २००० चे कलम ३(२)(ब), गॅस सिलेंडर अधिनियम २०१६ चे कलम ४३, ४५, ४६ तसेच स्फोटके अधिनियम १८८४ चे कलम ९(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस करत आहेत.दरम्यान, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
