आश्रम शाळेतील सहा आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृह अधीक्षकाची जळत्या लाकडाने बेदम मारहाण जिल्ह्यातील अत्यंत संतापजनक घटना
अकोले प्रतिनिधी (दि.४. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिरपुंजे आश्रम शाळा येथील सहा आदिवासी विद्यार्थ्यांना येथील वसतीगृह अधीक्षक यांनी जळत्या लाकडाने बेदम मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.या आश्रमशाळेतील विद्यार्थी अशोक संतु धादवड,युवराज भाऊ धादवड,बाबु संतु धादवड,दत्ता सोमनाथ धादवड,ओमकार भिमा बांबळे व गणेश लक्ष्मण भांगरे यांनी शेकोटी पेटविल्याचे कारण देत अधीक्षक याने विद्यार्थ्यांना अंगावर वळ उमठेपर्यंत मारहाण केली आहे.वसतीगृह अधीक्षक पाईकराव यांनी केलेल्या या अमानुष कृत्याचा डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) या युवक संघटनेने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.हे कृत्य करणाऱ्या वसतीगृह अधीक्षकाला तातडीने निलंबित करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.शिरपुंजे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षकांनी जबर मारहाण केल्याने त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी स्थानिक व पालकांनी केली आहे.माजी आमदार वैभवराव पिचड यांची भेट घेऊन स्थानिक नागरिक व पालकांनी मारहाणीबाबत माहिती दिली.प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांचेकडे पालकांनी तक्रार दाखल केली असून भवारी यांनी चौकशीअंती संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.