अंबड नगर परिषदेचा मनमानी कारभार..! संतप्त झालेल्या ‘लहुजी क्रांती सेने’चा थेट प्रतीकात्मक सरण रचून बेमुदत उपोषणाचा इशारा..!
अंबड (तरंग कांबळे):-अंबड नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार परिसरामध्ये मंजूर असलेल्या सार्वजनिक शौचालय व मुतारीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे,या मागणीसाठी लहुजी क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी आणि मागण्या मान्य होईपर्यंत येत्या १४ जून २०२६ पासून प्रतीकात्मक सरण रचून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल,असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,अंबड शहरातील आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.मात्र,मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला आजतागायत सुरुवात झालेली नाही.अंबड शहर व परिसरातील हजारो नागरिक, व्यापारी,शेतकरी,महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातून येणारे लोक प्रत्येक आठवड्याला या बाजारात येत असतात.मात्र,येथे सार्वजनिक शौचालयाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला, अस्वच्छतेला आणि मानहानीकारक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत लहुजी क्रांती सेनेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदने सादर करून काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.प्रत्येक वेळी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून “लवकरच काम सुरू होईल” किंवा “सात दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल”, अशी पोकळ आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडाला असून जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने शेवटी लहुजी क्रांती सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.येत्या १४ जून २०२६ पर्यंत जुनी निविदा रद्द करून नवीन प्रक्रिया राबवून काम सुरू न झाल्यास, तीव्र स्वरूपाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयालाही माहितीसाठी व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
