अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बिलाल भाई कुरेशी यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान..!
धाराशिव (विशेष प्रतिनिधी):-अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडणारे शिराढोण (ता.कळंब) येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बिलाल अब्दुल रहेमान कुरेशी यांना एका विशेष सोहळ्यात गौरविण्यात आले आहे.अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून ‘अल्पसंख्याक विकास महासंघ,पुणे (शिराढोण शाखा)’ यांच्या वतीने यावर्षीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार बिलाल भाई कुरेशी यांना अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला.
बिलाल भाई कुरेशी यांनी सामाजिक क्षेत्रात तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या याच निस्वार्थी आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला.
समाजातील वंचित आणि अल्पसंख्याक घटकांपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या हक्कांची सनदशीर मार्गाने अंमलबजावणी करण्यासाठी कुरेशी अविरतपणे प्रयत्नशील असतात.त्यांच्या याच योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुकाचा वर्षाव
या भव्य पुरस्कार वितरण समारंभास अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,परिसरातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिलाल भाई कुरेशी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. “बिलाल भाईंसारखे कार्यकर्ते समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत,” अशा भावना व्यक्त करत उपस्थितांनी त्यांच्या पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.या पुरस्कारामुळे बिलाल भाई कुरेशी यांच्यावर शिराढोणसह संपूर्ण कळंब तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
