तोफखाना पोलिसांचा धडक ‘अॅक्शन प्लॅन’! मोक्कातील कुविख्यात गुंड विजु पठारेसह न्यायालयाला चकवा देणारे ३२ आरोपी गजाआड शहरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):- तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि.३ ऑगस्ट २०२६) अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एका बाजूला मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेला संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या आणि कुविख्यात गुंड विजय उर्फ विजु राजू पठारे याला शेंडी बायपास येथून शिताफीने जाळ्यात पकडण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला पहाटे राबवलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान न्यायालयाला चकवा देणाऱ्या ३२ फरारी व वॉरंटी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या ‘ऑल-आऊट’ कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.झेडपी कॉलनी बेंद्रे हॉस्पिटल जवळील जुन्या भांडणाचा राग धरून फिर्यादी घोरपडे यांच्या कुटुंबावर आणि साक्षीदारांवर तलवार,कोयता व लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात (गु.र.नं १८४/२०२६) भारतीय न्याय संहिता व आर्म अॅक्टन्वये गुन्हा दाखल झाला होता.तपासा दरम्यान विजय राजू पठारे व त्याच्या इतर ४ सहकाऱ्यांनी स्वतःच्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.हे आरोपी अत्यंत उन्मत्त, निर्ढावलेले व कायद्याला न जुमानणारे असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांच्या मंजुरीने या गुन्ह्यात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९’ (MCOCA/मोक्का) ची कलमे वाढवण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी विजु पठारे हा नाशिक, पुणे,बीड,छत्रपती संभाजीनगर येथे राहून पोलिसांना सतत गुंगारा देत होता.त्यामुळे न्यायालयाने त्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते.३ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गुंड विजु पठारे हा शेंडी बायपास परिसरात येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली.बातमी मिळताच गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या स्टाफने शेंडी बायपास परिसरात तात्काळ सापळा रचला आणि अतिशय शिताफीने आरोपी विजु पठारे याच्या मुसक्या आवळल्या.
बातमी 2
पहाटे ३ वाजता ‘कोंबिंग ऑपरेशन’; न्यायालयाला चकवा देणारे ३२ आरोपी ताब्यात..दुसऱ्या एका मोठ्या धडक मोहिमेत,न्यायालयाच्या N.B.W (गैरहजर वॉरंट) मधून अनेक दिवसांपासून पसार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी तोफखाना पोलिसांनी ३ ऑगस्ट रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास संपूर्ण हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले.२३ गैरजामीनपात्र (NBW) वॉरंटमधील आरोपींना थेट ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.०९ जामीनपात्र (B.W) वॉरंटमधील आरोपींकडून जामीन कंदबा भरून घेऊन त्यांना न्यायालयात हजर राहण्याची समज देण्यात आली.अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि विविध न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असलेला सराईत आरोपी सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे यालाही या मोहिमेत अटक करण्यात आली आहे.त्याच्या अटकेमुळे न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली निघण्यास मोठी मदत होणार आहे.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढेही वेळोवेळी अचानक ‘वॉरंट बजावणी’ आणि ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून गुन्हेगारांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल.कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.असे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी यावेळी सांगितले.हि कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर) डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य,पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.
