एमआयडीसीतील थरारक मर्डर..भररस्त्यात ट्रेलर अडवून हत्या करणारे दोन्ही फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-रांजणगाव एमआयडीसी (जि.पुणे) हद्दीत लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला भररस्त्यात अडवून चालकाच्या साथीदाराची निघृण हत्या करणाऱ्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना गजाआड करण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे.पुणे आणि अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्तपणे लावलेल्या या जाळ्यात दोन्ही संशयित आरोपी अखेर अडकले असून, त्यांना पुढील कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,४ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी प्रतीक बबन खैरे (रा.देवाऱ्याची वाडी,ता.जि. बीड) आणि त्यांचा साथीदार दत्ता बबन पवार हे दोघे ट्रेलर्समधून जालन्याहून पुण्याच्या दिशेने लोखंडी रॉड घेऊन जात होते.रांजणगाव एमआयडीसी परिसरात आले असता,आरोपी देवा खेडकर व त्याच्या इतर अनोळखी साथीदारांनी कारमधून येत त्यांचा ट्रेलर अचानक अडवला.काही समजण्याच्या आतच आरोपींनी दत्ता बबन पवार यांच्यावर लाकडी दांडके,जाड वायरचा तुकडा आणि लोखंडी रॉडने पाठीवर व डोक्यात जीवघेणा हल्ला चढवला.या भयंकर मारहाणीत दत्ता पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ आणि १०९ (२) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.तपासा दरम्यान अहिल्यानगर येथील दीपक सतीश मुंडे आणि चैतन्य गोरख जायभाये या दोघांची नावे निष्पन्न झाली.पुणे पोलिसांनी तात्काळ याबाबत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली.
माहिती मिळताच अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष मुटकुळे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तैनात केले.
६ ऑगस्ट २०२६ रोजी या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेली पक्की बातमी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे शोधमोहीम राबवून दोन्ही संशयितांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले.ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,शाहीद शेख,गणेश धोत्रे,फुरकान शेख, संदीप पवार,प्रशांत राठोड, रणजीत जाधव,रमीजराजा आतार,भगवान थोरात,सतीश भवर आणि अमृत आढाव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
