पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण..लोकसहभागातून अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया अवाहन ..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करतानाच,देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया,असे आवाहन पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमनंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस मुख्यालय (पोलीस परेड ग्राउंड),अहिल्यानगर येथे पार पडला.भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,स्वातंत्र्यसैनिक,शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी आणि युवक उपस्थित होते.पालकमंत्री डॉ.विखे पाटील म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करताना शहीद झालेले जवान यांना आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. 
सर्वधर्मसमभाव,विविधतेतील एकता आणि लोकशाही मूल्ये ही भारताची खरी ताकद असून,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांसोबतच नागरिकांनी आपली कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत.अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वांगीण,संतुलित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया. लोकसहभागातून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी करूया,असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवत नागरिकांनी देशाप्रती अभिमान आणि भारतमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.शहरांपासून गावांपर्यंत, वाड्या-वस्त्यांपर्यंत तिरंगा फडकताना दिसणे ही देशाच्या एकजुटीची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी भावना असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या गीताला अनन्यसाधारण महत्त्व असून, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर होऊन विकसित आणि सामर्थ्यवान राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.कृषी,उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन व निर्यात,क्रीडा, कौशल्य विकास तसेच स्टार्टअप इंडिया,स्किल इंडिया आणि खेलो इंडिया यांसारख्या उपक्रमांमधून भारताने जागतिक पातळीवर आपली क्षमता सिद्ध केली आहे. समाजातील सर्व घटकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहिताचे निर्णय घेत असून, विकसनशील महाराष्ट्राच्या उभारणीसाठी शासन कटिबद्ध आहे.
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९७ कोटी ८१ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी जलसंधारण आणि सिंचन विकासाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमांतर्गत प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबुतीकरणासाठी ११० कोटी रुपये आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी ३१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपये, कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ४४९ कोटी रुपये, कुकडी डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४७ कोटी रुपये आणि उजव्या कालव्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा दुष्काळमुक्त करणे, धरणे गाळमुक्त करून त्यांची साठवण क्षमता वाढविणे आणि सिंचन क्षमता विस्तारण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, किसान सन्मान योजना तसेच शेती सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असून, सर्वाधिक शेततळी पूर्ण करण्याचा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला आहे.जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. जलसंवर्धनासाठी शासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी आवाहन केले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ९३४ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यात १ हजार ६९७ आणि कोपरगाव तालुक्यात ३४५ अशा एकूण २ हजार ४२ घरकुलांची वसाहत उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून ३१ हजार ४०० महिला बचत गटांमध्ये ३ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग नोंदविण्यात आला असून, या बचत गटांना आतापर्यंत ५०३ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘लखपती दीदी’ अभियानातही जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, १ लाख ८५ हजारांपेक्षा अधिक महिलांनी वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून लखपती दीदी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेला उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत ९५० महिलांनी उद्योग-व्यवसाय सुरू केला आहे. राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी महिला शेतकऱ्यांना आता स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. शिर्डी येथील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर तसेच श्रीगोंदा आणि श्रीरामपूर येथे संरक्षण उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागांमुळे जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.देश आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसोबतच अहिल्यानगर जिल्ह्याला विकासाच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी रोजगारनिर्मिती, तीर्थक्षेत्र विकास, शैक्षणिक प्रगती आणि कौशल्य विकासाला अधिक बळ देण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना लोकसहभाग वाढविणे आणि प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
