AI ला घाबरू नका,त्याला प्रगतीचे साधन बनवा श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे मानवाच्या पर्यायासाठी नसून मानवी क्षमतेला गती देण्यासाठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी AI तंत्रज्ञानाला घाबरून न जाता त्याचा सकारात्मक वापर आणि कौशल्यविकास आत्मसात करणे काळाची गरज आहे,” असा सूर येथे आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरात व्यक्त करण्यात आला.नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘विद्यार्थी जागरूकता आणि AI सह करिअर’ तसेच ‘IT क्षेत्रातील AI’ या विषयावर एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम ब्रँड वेव्हचे संस्थापक प्रणित मनोज भंडारी व वैष्णवी पाठक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात डिजिटल नागरी हे नॉलेज पार्टनर (ज्ञान भागीदार) म्हणून सहभागी झाले होते.
भविष्यातील कौशल्ये आणि रोजगाराच्या संधींवर भर
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते तथा ‘डिजिटल नागरी’चे संस्थापक पवन घावणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल आणि AI च्या प्रभावाविषयी सखोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, “AI मुळे पारंपरिक कामाच्या पद्धती बदलत असल्या,तरी नव्या युगात रोजगाराच्या अगणित नवीन संधी निर्माण होत आहेत.विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता स्वतःला आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत बनवले पाहिजे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विधायक वापर कसा करावा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, ऑटोमेशन आणि डेटा आधारित कौशल्यांचा विकास कसा करावा,याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
अहमदनगर प्रियदर्शिनी रोटरीचा साक्षरता उपक्रम
हा कार्यक्रम अहमदनगर प्रियदर्शिनी रोटरीच्या साक्षरता प्रकल्पांतर्गत राबविण्यात आला.या साक्षरता प्रकल्पाच्या प्रमुख रजनी मनोज भंडारी आणि गीता गिल्डा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.याप्रसंगी रोटरीच्या ज्येष्ठ सदस्या कुंदा हुलबे, विभावरी तामडे,मीनल गंडे आणि स्मिता लोढा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.तंत्रज्ञानाची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि करिअरची नवी दिशा निर्माण करण्यात हा सेमिनार अत्यंत यशस्वी आणि दिशादर्शक ठरला.उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
