केंद्रशासित प्रदेशातून छुप्या मार्गाने आलेली बेकायदेशीर दारू नेवाशात उतरली; LCB च्या धाडीत तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-केंद्रशासित प्रदेशातून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या अवैध विदेशी दारूच्या मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदा (ता.नेवासा) येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझा कारसह तब्बल १० लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक सोनई परिसरात गस्तीवर होते.दरम्यान,दादरा नगर हवेली आणि दमण-दीव येथून कंटेनरद्वारे बंदी असलेली विदेशी दारू विक्रीसाठी आणण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार,चांदा येथील संभाजी कचरू गायकवाड याच्या घरासमोर विक्रीसाठी उभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती ब्रिझा (क्रमांक MH-12-NU-9177) पोलिसांनी ताब्यात घेतली.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत कारमध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की (१८० मिलीच्या ६२४ बाटल्या) किंमत ५६,१६० रुपये,इम्पेरिअल ब्लू व्हिस्की (४८० मिलीच्या ३८४ बाटल्या) — किंमत ३२,६४० रुपये,मारुती सुझुकी ब्रिझा कार — किंमत १०,००,००० रुपये असा एकूण १०,८८,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेतलेल्या संभाजी गायकवाड याच्याकडे कसून चौकशी केली असता,हा साठा प्रवीण नानासाहेब धाडगे,राजेंद्रबापुराव जावळे आणि संदीप शिवाजी गायकवाड (सर्व रा.चांदा,ता. नेवासा) यांनी विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. पोलिसांनी शोध घेतला असता हे तिघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), ८३ (अ) अन्वये गुन्हा रजि. नं. ४२३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड,पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विकास साळवे,अमृत आढाव आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.
