विमाननगरमध्ये विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास;अनधिकृत पार्किंग विरोधात ‘आप’ आक्रमक,वाहतूक उपायुक्तांना थेट विचारला जाब..!
पुणे (प्रतिनिधी):-विमाननगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेली बेशिस्त वाहनांची गर्दी,पदपथांवर झालेले अनधिकृत अतिक्रमण आणि नियमबाह्य पार्किंगमुळे सामान्य पादचाऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची भेट घेऊन परिसरातील वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला. अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
पादचाऱ्यांचे हक्क हिरावले;शाळकरी मुलांचा जीव धोक्यात..
विमाननगरमधील कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांची बेकायदा रांग लागलेली असते. नागरिकांच्या सुरक्षित चालण्यासाठी बांधलेले फुटपाथ अतिक्रमणांनी गिळंकृत केल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशःजीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून चालावे लागत आहे.शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत या मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून,गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
शिष्टमंडळाची उपायुक्तांसोबत चर्चा;P1-P2 चा प्रस्ताव अंतिम टप्प्यात..
या वाढत्या त्रासाची दखल घेत ‘आप’च्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक परिसरात सम-विषम (P1-P2) पार्किंग नियमावली तातडीने लागू करावी,अशी मागणी करण्यात आली.या बैठकीदरम्यान वाहतूक विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देत सांगण्यात आले की,या परिसरासाठी P1-P2 पार्किंगचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच अंमलबजावणी करून पार्किंगची समस्या मार्गी लावली जाईल.”फुटपाथ हा केवळ आणि केवळ पादचाऱ्यांच्या हक्काचा आहे.विशेषतःशाळकरी मुलांना सुरक्षित रस्ता मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा,प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली पाहिजेत.केवळ निवेदन देऊन हा लढा संपणार नाही; जोपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर सुधारणा दिसत नाही,तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील असा इशारा आपच्या वतीने देण्यात आला.
