गावठी कट्टा विकायला आला अन् स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर ते पुणे महामार्गावरील बेलवंडी फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. मंगल कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांच्या हाती जे लागले, ते पाहून परिसरातील नागरिकांचेही धाबे दणाणले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि त्यांच्या पथकाने बेलवंडी परिसरात गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की,देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील एक तरुण बेलवंडी फाट्यावरील शुभम गार्डन मंगल कार्यालयाजवळ शस्त्र विक्रीसाठी येणार आहे. माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत संशयित हालचाली करताना दिसताच पोलिसांनी भागवत ज्ञानदेव वनवे (वय २६, मूळ रा.वनवेवाडी, ता.आष्टी, जि. बीड; सध्या रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष कसून झडती घेतली असता, त्याच्याकडून:₹५०,००० किमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) ₹१,००० किमतीचे १ जिवंत काडतूस
₹२०,००० चा मोबाईल असा तब्बल ₹७१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी आरोपीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. हा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस त्याने संग्राम गोविंद पंडित (रा. गेवराई, जि. बीड) याच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.सध्या संग्राम पंडित फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.आरोपी विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट ३/२५, ७/२५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.संतोष मुटकुळे,पोउपनि.संदीप दरवडे,अंमलदार सोमनाथ झांबरे,बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे,भगवान सानप आणि भगवान धुळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
