कोतवाली पोलिसांचा ‘हायटेक’ दणका..! २४ तासांत सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकला ई-बाईक चोर मुद्देमालासह गजाआड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात चोरीचा एक असा प्रकार समोर आला आहे,ज्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मेडिकलसमोरून क्षणात दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अशा पद्धतीने गजाआड केले की स्वतःआरोपीही चक्रावून गेला.३० सप्टेंबर रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास माळीवाडा भागातील इम्पेरिअल चौक येथील वेलनेस मेडिकलसमोर उभी असलेली ‘क्वांटम’ (Quantum) कंपनीची मिलान मॉडेल इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी (क्रमांक: MH 03 EU 5933) अज्ञात चोरट्याने क्षणात गायब केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या.घटनास्थळावरील गुप्त माहिती,सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला.
अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी संतोष मोहन काळे (वय ३९ वर्षे,रा.खर्डे निवास,बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) याला शिताफीने ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली २० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सपोनि.विशाल चिटणीस,पोहेकॉ.सूर्यकांत डाके,विशाल दळवी,रमेश शिंदे,विनोद बोरगे,सूरज कदम, शिरीष तरटे,अतुल कोतकर,अतुल लोळगे,पवार,संकेत धिवर,अतुल लाटे,वैभव काळे, अतुल शेंडे,चालक संदीप शेंडगे, तसेच सायबर/मोबाईल सेलचे राहुल गुंड,अरुण सांगळे आणि सीसीटीव्ही कक्षाच्या मपोहेकॉ.प्रभावती कोकाटे यांनी केली आहे.पुढील तपास पोहेकॉ सूर्यकांत डाके करत आहेत.
