शहरातील ‘त्या’ बिंगो जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहाता शहरातील चितळी रोड परिसरातील एका बंदिस्त गाळ्यात पडद्यामागे सुरू असलेल्या हायटेक जुगाराचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.टीव्ही स्क्रीनवर ‘बिंगो’ नावाचा जुगार खेळवून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या असून,या धडक कारवाईने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.विकास जाधव व त्यांच्या पथकाने राहाता परिसरात गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली.चितळी रोडवरील सावता मेडिकलच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात टीव्ही स्क्रीन लावून बिंगो जुगाराचा अड्डा सुरू असल्याची पक्की खबर मिळताच,पथकाने दबा धरून पंचांसमक्ष थेट गाळ्यावर छापा टाकला.
आतमध्ये आरोपी दीपक किशोर सोळंकी (वय ३८,रा.विशालनगर,राहाता) हा मोठ्या स्क्रीनवर बिंगो जुगार चालवताना थेट रंगेहात पकडला गेला.पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे संपूर्ण डिजिटल साहित्य आणि रोकड जप्त केली.ताब्यात घेतलेल्या आरोपीसह सर्व मुद्देमाल राहाता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून, आरोपी दीपक सोळंकी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि.विकास जाधव,पोलीस अंमलदार विजय पवार,राहुल डोके,भगवान थोरात,भिमराज खर्से,सुनिल मालणकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली.
