एलसीबी कडून फरार व पाहिजे अशा ८ आरोपींचा छडा..गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यभरात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम सुरू झाली असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या विशेष पथकाने तब्बल ४ फरार व ४ पाहिजे आरोपींचा एकाच दिवशी निपटारा करत गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे.महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिलेखावरील फरार व पाहिजे आरोपी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने जिल्ह्याभरात धाडसत्र राबवले.२ ऑक्टोबर रोजी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून ४ आरोपींना थेट बेड्या ठोकत संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात दिले. याव्यतिरिक्त ३ आरोपी जामिनावर मुक्त असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे जामीन आदेश सादर करण्यात आले, तर एका मयत आरोपीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करून अभिलेखावरून नाव कमी करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार विष्णु भागवत,सागर ससाणे, रोहित येमुल,अतुल लोटके, अमोल आजबे,प्रकाश मांडगे, संदिप पवार,राहुल द्वारके, शाहीद शेख आणि अभिजीत अरकल यांच्या पथकाने ही धडक कामगिरी फत्ते केली.महिनाभर ही मोहीम अशीच कडक सुरू राहणार असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
