संविधान भवन व उर्दू शाळेसह विविध मागण्यांचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित..प्रशासनाच्या आश्वासनानंतर निर्णय मात्र,मागण्यांची पूर्तता न झाल्यास सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहणार
कराड (प्रतिनिधी/विजया माने):-कराड शहरात भव्य संविधान भवन उभारणे,कचरा डेपो परिसरातील उर्दू शाळेची वादग्रस्त परवानगी,रस्त्याची आखणी व विकासकामांची चौकशी या विविध विषयांवरून १२ ऑगस्ट पासून सुरू असलेले धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.नगरपालिका मुख्याधिकारी,पोलीस उपअधीक्षक (DYSP) आणि महसूल प्रशासनासोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर व त्यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर स्वातंत्र्य दिनाचा मान राखून हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आंदोलकांनी जाहीर केले.कराड शहरात संविधान भवन भव्य-दिव्य स्वरूपात व्हावे,यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
कचरा डेपो लगतची उर्दू शाळा व बफर झोन:कचरा डेपोच्या २०० ते ५०० मीटर बफर झोन नियमांचे उल्लंघन करून नगररचना विभागामार्फत शाळेच्या कामास परवानगी देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.नगरसेवकांना व नागरिकांना विश्वासात न घेता प्रशासक काळात कचरा डेपो परिसरातील रस्त्याची दिशा व आखणी बदलण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला.कचरा डेपो येथे लाल माती टाकून सुशोभीकरण/गार्डन करण्यासाठी झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चाची चौकशी आणि प्रकाश नगरमधील कामांबाबत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.पोलीस उपअधीक्षक दालनात आंदोलक आणि मुख्याधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत, गार्डनच्या कामाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे मान्य करण्यात आले तसेच प्रकाश नगरमधील वादग्रस्त काम थांबवून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.
संबंधित विषयांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून, जोपर्यंत सर्व बाबींचा खुलासा होत नाही तोपर्यंत संबंधित वादग्रस्त कामांना स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी व तोंडी आश्वासनांनंतर,तसेच १५ ऑगस्ट या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचा सन्मान राखून आत्मदहन व धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.मात्र,मागण्यांची पूर्तता न झाल्यास सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कायदेशीर मार्गाने लढा सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
