अखेर तहसीलदारांच्या गाडीवरून लाल दिवा हटवला..!कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही!” मनसेच्या आक्रमक ठिय्या आंदोलनापुढे झुकले प्रशासन;RTO ची मोठी कारवाई!
पारनेर (प्रतिनिधी):-सामान्य जनतेला नियमांचे धडे देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नियमबाह्य कारभार पारनेरमध्ये उघडा पडला आहे. शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करत पारनेर तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर बसवण्यात आलेला अनधिकृत लाल अंबर दिवा अखेर उतरवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ने पुकारलेल्या आक्रमक ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनाला ही थेट कारवाई करणे भाग पडले.तहसीलदारांच्या गाडीवरील नियमबाह्य लाल दिव्याविरोधात मनसेने तीव्र आक्षेप घेत जोरदार ठिय्या आंदोलन केले होते.मनसेच्या या दणक्यानंतर जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विनोद सगरे यांच्या आदेशानुसार,मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार यांच्या पथकाने तातडीने पारनेरमध्ये दाखल होऊन तहसीलदारांच्या वाहनावरील तो अनधिकृत लाल अंबर दिवा जागीच काढून कारवाईचा बडगा उगारला.
या धडक कारवाईनंतर मनसे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी प्रशासनाला कडक शब्दांत फटकारले कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.सामान्य नागरिकांवर नियमभंगाची कारवाई करणारी यंत्रणा स्वतःच शासकीय नियम पायदळी तुडवणार असेल,तर ते आम्ही खपवून घेणार नाही. मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा नियमबाह्य दिवा उतरवला गेला असून हा मनसेचा नव्हे, तर कायद्याचा आणि जनतेचा विजय आहे.यापुढेही कोणत्याही अधिकाऱ्याने कायद्याचा भंग केल्यास मनसे रस्त्यावर उतरून असाच धडा शिकवेल.पारनेर तहसीलदारांच्या गाडीवरून लाल दिवा उतरवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्यात एकच चर्चा रंगली असून मनसेच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.
