गोवंशीय जनावरांचा कत्तलीचा मोठा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळला..अन्न-पाणी विना अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका..
अहिल्यानगर/संगमनेर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात निर्दयी कत्तलीचा मोठा आणि भयानक डाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ऐनवेळी उधळून लावला आहे.रहेमतनगर परिसरातील निर्मनुष्य काटवनात विना अन्न-पाणी अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली असून,घटनास्थळावरून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल व बेकायदेशीर वाहतुकी विरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे थेट आदेश दिले आहेत.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले,बाळासाहेब गुंजाळ आणि रोहित येमुल यांचे विशेष पथक संगमनेरमध्ये तैनात केले होते.
१७ ऑगस्ट २०२६ रोजी संगमनेर शहरात अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की,रहेमतनगर जवळील ‘आर के प्लॉटिंग’ लगत असलेल्या दाट काटवनात अज्ञात इसमांनी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बांधून ठेवले आहेत.
पोलिसांनी तातडीने पंचांसमक्ष छापा टाकला असता,त्या ठिकाणी ११ लहान-मोठे गोवंश चारा-पाण्याविना अत्यंत हालअपेष्टेत बांधलेले आढळून आले.पोलिसांनी तात्काळ १,७०,०००/-रू.किमतीच्या सर्व ११ गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.आजूबाजूच्या परिसरात विचारपूस केली असता हे जनावरे कोणाचे आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मालकांविरुद्ध गु.र.नं. ७८९/२०२६ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) चे कलम ५ (अ)(ब),९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
