चिमुकल्या हातांनी साकारला ‘बाप्पा’! निमगाव खैरीच्या जि.प.शाळेतील अनोख्या कार्यशाळेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर..शाडूच्या मातीतून साकारल्या सुबक गणेशमूर्ती..
श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):-गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत कला,सृजनशीलता आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.शाळेच्या ‘आनंददायी शनिवार’ या अभिनव उपक्रमांतर्गत शाडू व चिकण मातीपासून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.मातीचा ओला सुगंध आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद यामुळे संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.
केवळ तोंडी सूचना न देता प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्याच्या हेतूने शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका प्रतिभा तोरणे,मीना निकम,सुधा गमे तसेच पालक तुळसाबाई पवार यांनी स्वतः माती मळून गणेशमूर्ती तयार केल्या.शिक्षकांचा हा उत्साह पाहून विद्यार्थ्यांनीही कल्पकतेचा वापर करत सुबक,देखण्या आणि विविध रूपांतील गणेशमूर्ती आपल्या चिमुकल्या हातांनी साकारल्या.कार्यशाळेदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) घातक परिणामांची जाणीव करून देत जलप्रदूषण रोखण्यासाठी मातीच्या मूर्तींचे महत्त्व पटवून दिले.पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश थेट कृतीतून बालमनावर बिंबवणारा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठा वाव देणारा ठरला.या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल निमगावचे पालक,ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी शाळा प्रशासनाचे भरभरून कौतुक केले.
