मध्यरात्री उबेर बुक केली,गळ्यावर कोयता ठेवला..अन् ड्रायव्हरचे हात-पाय बांधून गाडीतून फेकणाऱ्या टोळीस एलसीबीने शिकवला असा धडा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मध्यरात्रीच्या अंधारात उबेर कॅब बुक करून चालकाच्या गळ्यावर कोयता ठेवत त्याचे हात-पाय आणि तोंड बांधून चालत्या गाडीतून फेकून देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या थरारक गुन्ह्यातील शामसुंदर रविप्रताप गौड (वय २६,मूळ रा.महराजगंज,उत्तर प्रदेश;सध्या रा.बदलापूर, ठाणे),सिद्धार्थ मिथवा चव्हाण (वय १९, मूळ रा.आष्टी,बीड; सध्या रा.कल्प निसर्ग, बदलापूर),किसन दिग्विजय कहार (वय २२,मूळ रा. महराजगंज,उत्तर प्रदेश; सध्या रा. बदलापूर) या तीन आरोपींना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुण्यातील दिघी येथील रहिवासी व उबेर चालक सोपान गोविंद दंडगुले (वय ३६) हे १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री २:३० वाजता नाशिक येथून शिर्डीसाठी भाडे घेऊन निघाले होते.गाडीत प्रवासी म्हणून बसलेल्या तीन जणांनी कोपरगाव परिसरात आल्यावर गाडी पोहेगावच्या दिशेने घेण्यास सांगितले. त्यानंतर अचानक गाडी थांबवून चालकाच्या गळ्याला थेट धारदार कोयता लावला.आरोपींनी चालकाचा मोबाईल हिसकावून घेत त्याचे हात, पाय,तोंड आणि डोळे दोरीने बांधले.त्यानंतर त्याला वांबोरी (ता.राहुरी) शिवारात आणून रस्त्यावर फेकून दिले व मारुती सुझुकी अर्टिगा कार घेऊन फरार झाले.या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १४०(३), ३(५) अन्वये दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक संदीप दरवडे व पथकाला तपासासाठी रवाना केले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यांच्या आधारे ही टोळी ठाण्यातील बदलापूर येथे लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तात्काळ बदलापूर गाठून त्या तिघांना ताब्यात घेतले.सदरील आरोपी हे गाडी विकायच्या तयारीत होते,पण…पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांनी पळवलेली अर्टिगा कार जेऊर टोलनाक्याजवळील हनुमान मंदिराजवळ लॉक करून ठेवली होती आणि ते या कारच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत होते.पोलिसांनी घटनास्थळावरून १० लाख रुपयांची अर्टिगा कार,गुन्ह्यात वापरलेल्या दोन लोखंडी कत्ती (कोयते),३ मोबाईल, सिमकार्ड व रोख रक्कम असा एकूण ११,७१,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि संदीप दरवडे,पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे,भगवान सानप, सतीश भवर,फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथकाने केली असून, आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
