दारूच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनीच केला मुलाचा खून;मृतदेह शेततळ्यात जाळल्याची धक्कादायक घटना नगर तालुका पोलिसांनी आणली उघडकीस..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दारू पिऊन रोज घरात त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा वडिलांनी लाकडी दांडक्याने डोक्यात मारून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आई-वडिलांनी मिळून त्याचा मृतदेह शेतात जाळून टाकल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना अहिल्यानगर तालुक्यातील गुणवडी येथे उघडकीस आली आहे.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी वडील प्रकाश विनायक लांडगे व आई यांच्या विरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोसई.मोंढे,पोसई.धुमाळ, पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे आणि पोहेकॉ.वांढेकर हे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रुईछत्तीसी बीट हद्दीत गस्तीवर असताना गुप्त त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की,गुणवडी गावच्या शिवारात प्रकाश विनायक लांडगे यांच्या शेतातील कोरड्या शेततळ्यात मनुष्यसदृश काहीतरी जळालेले दिसत असून बारीक हाडे पडलेली आहेत.पोलीस पथकाने तात्काळ गुणवडी येथील गट नंबर १५१ मधील शेतात जाऊन खात्री केली असता,शेततळ्यात काही दिवसांपूर्वी मनुष्यसदृश काहीतरी जाळल्याचे आणि हाडे पडलेली दिसून आली.
पोलिसांनी गावातील नागरिकांकडे चौकशी केली असता,प्रकाश लांडगे यांचा मुलगा प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५,बोलता येत नसलेला) हा गेल्या १०-१२ दिवसांपासून गावात दिसला नसल्याचे आणि घरात सतत वाद होत असल्याने प्रवीणचा त्यांनीच खून केला असावा असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला.पोलिसांनी संशयित वडील प्रकाश लांडगे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.प्रवीण याला स्पष्ट बोलता येत नव्हते,परंतु तो नेहमी दारू पिऊन घरात भांडणे करून त्रास देत होता. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास प्रवीण दारू पिऊन आला आणि घरातील भांडी फेकून आई-वडिलांना मारहाण करू लागला.त्यावेळी संतप्त झालेल्या वडिलांनी पडवीतील लाकडी दांडका प्रवीणच्या डोक्यात मारला.जोरदार फटक्यामुळे प्रवीण बेशुद्ध पडून जागीच ठार झाला. प्रवीण मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी मृतदेहावर पांघरूण टाकून ठेवले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता प्रवीणचा मृतदेह गोणीत भरला आणि लुना मोटरसायकलवरून शेतात नेला.तेथील कोरड्या शेततळ्यातील सरपणात मृतदेह टाकून रात्रीच्या वेळी पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोहेकॉ.आबासाहेब झावरे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस करत आहेत.
