नाशिक-पुणे महामार्गावर फिल्मी स्टाईल सापळा;१५२ किलो गांजासह दोघांना बेड्या, आंतरराज्यीय टोळीचे धागेदोरे उघड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एका आलिशान टाटा नेक्सॉन कारमधून सामान्य प्रवाशांप्रमाणे दोघे जण प्रवास करत होते…रस्ता नाशिक-पुणे महामार्गाचा होता,पण पोलिसांना एका गुप्त खबऱ्याने टीप दिली अन् पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण महामार्गावर थरार रंगला! पोलिसांनी सापळा रचून कार अडवली,तपासणी सुरू झाली आणि कारच्या आत जे सापडले ते पाहून खुद्द पोलीस पथकही चक्रावून गेले. ओडिशा ते पुणे असा चालणारा मोठा अंमली पदार्थांचा गोरखधंदा पोलिसांनी एका झटक्यात उद्ध्वस्त केला आहे.या कारवाईत तब्बल ८८ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आंतरराज्यीय रॅकेटची पोलखोल झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याचे थेट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले होते.त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.विकास जाधव व अंमलदारांचे पथक संगमनेर भागात गस्तीवर होते.यादरम्यान नाशिककडून संगमनेरच्या दिशेने एका पांढऱ्या टाटा नेक्सॉन (क्रमांक MH-12 UF 9113) कारमधून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाट्यावर रणनीती आखून सापळा लावला.संशयित कार महामार्गावर येताच पोलिसांनी वेगाने घेरून तिला थांबवले. पंचांच्या उपस्थितीत जेव्हा कारची कसून झडती घेण्यात आली, तेव्हा आत खाकी पुडक्यात लपवलेला तब्बल १५२.६१ किलोग्रॅम उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला.आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे ७६ लाख ३० हजार रुपये आहे.पोलिसांनी याप्रकरणी कारमधील दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय ३३, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे),श्रीहरी बाळु मिडगुले (वय ३५, रा.कवठे यमाई, ता. शिरूर, जि.पुणे) या दोन आरोपींना जागीच बेड्या ठोकल्या.आरोपींकडे पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता,त्यांनी हा गांजा ओडिशा राज्यातून ‘कुंफू’ नावाच्या संशयिताकडून आणल्याची धक्कादायक कबुली दिली.
हा माल पुढे पुण्यातील साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबु मिडगुले (रा. कान्हूर मसाई,शिरूर) आणि विशाल उर्फ दाद्या (रा.पुणे) यांच्याकडे सोपवला जाणार होता.या फरार तिघांचाही पोलीस आता युद्धपातळीवर शोध घेत आहेत.याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act कलम ८(क), २०(ब), ii(क), २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे, संगमनेर शहरचे पोनि.संदीप वऱ्हाडे,सपोनि.विकास ढोकरे, पोउपनि.विकास जाधव,सुरज मेढे,संतोष पगारे,रावसाहेब लोखंडे आणि पोलीस अंमलदार विजय पवार,रिचर्ड गायकवाड,विकास साळवे, राहुल डोके,भिमराज खर्से, भगवान थोरात,सुनिल मालणकर,महादेव भांड, आत्माराम पवार,विजय आगलावे,विशाल कर्पे व ऋतीक बेनके यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे पुरते दणाणले आहेत.
