धक्कादायक! दुकानाचे कुलूप तोडून तब्बल ११ लाखांच्या सिगारेट लंपास;स्थानिक गुन्हे शाखेने अशा आवळल्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा येथील व्यापाऱ्याच्या दुकानाचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सिगारेटचे बॉक्स लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी चार सराईत चोरांना पिंपरी-चिंचवड परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून श्रीगोंदा आणि दौंड येथील गुन्ह्यांमधील तब्बल ११ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि.४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास श्रीगोंदा येथील रिव्हर पार्क बिल्डिंगमधील ‘साहिल ट्रेडर्स’ या दुकानाची कुलूप लावण्याची पट्टी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे १० लाख ५ हजार ८०० रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स चोरून नेण्यात आले होते.याप्रकरणी फिर्यादी सद्दाम अन्वर शेख यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
हा गुन्हा चाकण येथील सराईत गुन्हेगार व्यंकटेश उर्फ हर्षल जाधव आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.पोलिसांनी चाकण आणि काळेवाडी (पिंपरी-चिंचवड) परिसरात सापळा रचून व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव (वय २२, रा. चाकण, पुणे),गोविंद लालु रूपवते (वय २१, रा. भोसरी, पुणे),पीरप्पा उर्फ सचिन जगन्नाथ येरे (वय २२, रा. भोसरी,पुणे),संजय उर्फ पंकज सर्वन वर्मा (वय २०, रा. भोसरी, पुणे) या चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात रूपेश उर्फ दादया भोसले आणि गौरव वारे (दोन्ही रा.चाकण) हे दोन साथीदार फरार असल्याचे समोर आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली.
आरोपींकडे कसून चौकशी केली असता,त्यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी दौंड (जि. पुणे) येथेही एका वाहनावरील १ लाख ४० हजार ९०० रुपयांची सिगारेटची पिशवी चोरल्याची कबुली दिली. चोरलेला हा सर्व माल त्यांनी चिंचवड,काळेवाडी व पिंपरी येथील व्यापाऱ्यांना विकला होता.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून श्रीगोंदा व दौंड या दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ११ लाख ४६ हजार ७०० रुपयांचे सिगारेटचे बॉक्स हस्तगत केले.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि.कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सुयोग सुपेकर,राहुल द्वारके, प्रताप देवकाते,विशाल तनपुरे, अमृत आढाव आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
