मध्यरात्री घराचा दरवाजा तोडला अन गळ्यावर कोयता ठेवून केली लूट…स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या कश्या आवळल्या मुसक्या वाचा सविस्तर..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मध्यरात्री शांत झोपेत असलेल्या निष्पाप कुटुंबाच्या गळ्यावर कोयता आणि चाकू ठेवून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात दरोडेखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत.जामखेड तालुक्यातील जवळा येथे पडलेल्या भीषण दरोड्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल ५ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून,त्यांच्याकडून तब्बल १० गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.दि.२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास जवळा (ता.जामखेड) येथील रहिवासी मनिषा श्रीमंत गोरे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवला.कुटुंबातील सदस्यांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटून नेले होते.या घटनेने संपूर्ण जामखेड परिसर हादरला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.अनंत सालगुडे आणि पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पिंपळगाव आवळा परिसरात सापळा रचून प्रदिप उर्फ गुड्या बिडकुत्या काळे,अनिल सुल्या पवार,सुविकास बिडकुत्या काळे,रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५) (सर्व रा. पिंपळगाव आवळा, जामखेड),समाधान उर्फ कारभारी दिपक काळे (वय २१, रा. वाकी,जामखेड) अशा ५ आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी धक्कादायक कबुली दिली. सारिका चंदन काळे (रा. चोभेवाडी) हिच्या प्लॅनिंगनुसार आणि सांगण्यावरून हा दरोडा टाकण्यात आला होता.लुटलेले सोने विकून वाटणी केली जात होती.या टोळीने जामखेड परिसरातील राजुरी, डोळेवाडी,आरणगाव, धामणगाव,वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि चौंडी परिसरात केलेल्या जबरी चोऱ्यांची कबुली दिली असून जामखेड व खर्डा पोलीस ठाण्यातील तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहे.
आरोपींनी चोरी केलेले दागिने ज्या इसमांकडे ठेवले होते, त्यांना कायदेशीर नोटिसा बजावून पोलिसांनी तब्बल ४२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (ज्यामध्ये बोरमाळ, मंगळसूत्र, गंठण, कर्णफुले व अंगठी) असा एकूण ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्यासह जप्त केला आहे.या गुन्ह्यातील इतर साथीदार सारिका काळे, लहु पवार, सोन्या काळे आणि परबत शिंदे हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि अनंत सालगुडे व अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,मनोज साखरे,बाळासाहेब खेडकर,अमोल आजबे,प्रकाश मांडगे,प्रशांत राठोड, सुनिता पवार व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.
