तब्बल ९ वर्षांपासून फरार असलेल्या ३७६ च्या गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी भरचौकातून उचललं..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बलात्काराच्या गुन्ह्यात सन 2017 पासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने श्रीगोंदा येथून जेरबंद केले.रिपुस उर्फ इपुस मेहरा भोसले (रा.लोणीव्यंकनाथ,ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना आरोपी श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती गुन्हे शोध पथकाचे सपोनि.विशाल चिटणीस यांना दिली.पथकाने श्रीगोंदा येथे जाऊन शनी चौक परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या इसमाची चौकशी केली.त्याने आपले नाव रिपुस उर्फ इपुस मेहरा भोसले असल्याचे सांगितले.खात्री केल्यानंतर त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तपासणीअंती तो कोतवाली पो.स्टे. गुन्हा रजि. क्र. 0341/2017, भादंवि कलम 376, 365, 336, 342 अन्वये दाखल गुन्ह्यात 2017 पासून फरार असल्याचे निष्पन्न झाले.
त्यास तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार आंग्रे करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केली आहे.
