ऑपरेशन ऑलआउट..अवैध धंदे,हिस्ट्रीशीटर,फरार आरोपी आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात धडक ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ या वेळेत ही जोरदार मोहीम राबवण्यात आली.या एकाच रात्रीच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाले, हिस्ट्रीशीटर आणि सराईत गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी,स्थानिक गुन्हे शाखा (LCB),एकूण ५७ पोलीस अधिकारी,२०७ पोलीस अंमलदार आणि १०१ होमगार्ड अशी मोठी फौज रस्त्यावर उतरली होती.मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर कडक नाकाबंदी करून संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे,हद्दपार आरोपी, वॉरंटमधील गुन्हेगार आणि मद्यधुंद वाहनचालकांवर तातडीने कारवाई करण्यात आली.
मोहिमेत झालेली धडक कारवाई..तपासणी कारवाईची संख्या
१)नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी ११३६
२)वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केसेस २२६
३)ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह (दारू पिऊन वाहन चालवणे) १२
४)हद्दपार केलेल्या आरोपींची चेकिंग ५०
५)नॉन-बेलेबल (अजामीनपात्र) वॉरंट बजावणी ८२
६)हॉटेल आणि लॉजिंगची अचानक तपासणी २५५
७)सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशीटर) चेकिंग १५९
८)अवैध धंद्यांवर छापे व गुन्हे दाखल २३
९)फरार आरोपी शोधून अभिलेखावरून कमी २०
१०)पाहिजे (वॉन्टेड) आरोपी शोधून अभिलेखावरून कमी ३६
जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही,असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून अशा प्रकारच्या अचानक आणि धडक मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या सतर्कतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
