“माहिती देतो का पोलिसांना?” थेट पाठीत झाडली गोळी अन् कुऱ्हाडीने केले वार..थरारक हत्येच्या प्रयत्नातील ३ आरोपी LCB कडून अटकेत..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका तरुणावर घरात घुसून थेट पाठीत गोळी झाडत कोयता, चाकू आणि कुऱ्हाडीने निर्घृण प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीतील ३ कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.या खळबळजनक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.दि.१० ऑक्टोबर रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास नागफनी (साईनाथनगर,ता.नेवासा) येथे रमेश छगन भोसले हे आपल्या घरात असताना कल्याण चव्हाण,कुणाल चव्हाण,अभी चव्हाण यांच्यासह सुमारे १० जणांच्या टोळक्याने घरात घुसून धुमाकूळ घातला. “तू पोलिसांना खबरी देतोस का?” असा जाब विचारत अभिषेक उर्फ अभी चव्हाण याने थेट बंदुकीतून रमेश भोसले यांच्या पाठीत गोळी झाडली.
गोळी लागून खाली पडल्यानंतर कुणाल चव्हाण याने कोयत्याने,आकाश चव्हाण याने चाकूने,तर गणेश चव्हाण व उमेश भोसले यांनी कुऱ्हाडीने डोक्यावर, हातावर, पोटावर आणि पायावर सपासप वार केले.इतर हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून रमेश यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला.या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात BNS कलम १०९(१), ११८(१), ११५(२), १८९(२), १९० सह आर्म्स ॲक्ट ३/२५ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने विशेष पथक रवाना केले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून पथकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज परिसरात धाड टाकून उमेश हरिसिंग भोसले (वय २८,रा.बाभुळखेडा,ता. नेवासा) व आकाश गौतम चव्हाण (वय २०,रा. इमामपूरवाडी,ता.पैठण) या दोघांना ताब्यात घेतले.तर नेवासा परिसरातून मुख्य हल्लेखोर कुणाल कल्याण चव्हाण (वय ३४,रा.जळके खुर्द, ता. नेवासा) याला बेड्या ठोकल्या.ताब्यात घेतलेला आरोपी उमेश भोसले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाळुंज पोलीस ठाण्यात यापूर्वी जबरी चोरीचे (भादंवि ३९२) गंभीर गुन्हे दाखल आहेत.तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि संदीप दरवडे,पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे,आजिनाथ पाखरे,रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर,रमीजराजा आत्तार,सागर ससाणे,प्रशांत राठोड व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.
