LCB..’स्वस्तात सोने देतो’ म्हणून गंडा घालणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कमी पैशांत जास्तीचे सोने देण्याचे आमिष दाखवून निष्पाप नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून तब्बल ₹६,६०,००० किमतीची ४४ ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे.या कारवाईमुळे घारगाव,नेवासा,कोपरगाव आणि मिरजगाव पोलीस ठाण्यांतील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.दि.३० सप्टेंबर २०२६ रोजी चिखलठाण (ता.राहुरी) येथील फिर्यादी सोपान डोलनर यांच्या वृद्ध आई साकुर बसस्थानक (ता.संगमनेर) येथे थांबल्या होत्या.त्यावेळी तिघा भामट्यांनी त्यांना जास्तीचे सोने देण्याची भुरळ घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने काढून घेतले व पोबारा केला.याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक नेमले.गोपनीय खबऱ्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना,पथकाने पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातून मुख्य संशयित सचिन संजय गायकवाड (रा.औरंगपूर,ता.शिरूर,जि.बीड) याला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व साथीदारांची नावे उघड केली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याचा साथीदार संतोष मोहनराव चिंतामणी (रा. नाळवंडी नाका,जि.बीड) यालाही अटक केली.या गुन्ह्यातील शहादेव रामदास जाधव (रा.वडवणी) आणि आबा तुपे (रा.औरंगपूर) हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि. कृष्णकुमार सेदवाड,अंमलदार निळकंठ कारखेले,राहुल द्वारके,गणेश लोंढे,विशाल तनपुरे,रोहित मिसाळ,भगवान सानप,फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.पुढील तपासासाठी आरोपींना मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
