अहिल्यानगरात राज्यस्तरीय याजकीय सन्मान सोहळा उत्साहात संपन्न;महाराष्ट्रातील ६० याजकांचा गौरव..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील संजोग लॉन येथे स्व.अशोक श्रीसुंदर बहुउद्देशीय संस्था व ‘साप्ताहिक उपदेशक’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुशीलाताई श्रीसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय याजकीय सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन रेव्ह.सतीश नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.या राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर,नाशिक,पुणे, मुंबई,जालना अशा विविध जिल्ह्यांतील याजकांचा सन्मान शनिवार,दि. १०/१०/२०२६ रोजी करण्यात आला.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुशीलाताई श्रीसुंदर म्हणाल्या की,“ज्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन चांगल्या संस्थेच्या माध्यमातून सेवा केली आहे आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे कार्य केले आहे,त्यांचा सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘उपदेशक’ साप्ताहिकाचे संपादक/संस्थापक विक्रम गायकवाड यांनी आपल्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.त्यांनी नमूद केले की,गेल्या वीस वर्षांपासून ‘उपदेशक’ साप्ताहिकाने शिक्षक,नर्सेस,समाजभूषण पुरस्कारांचा गौरव केला आहे.
तसेच “सामाजिक बांधीलकी जोपासणारे याजक हे समाजाला दिशा देण्याचे बहुमूल्य कार्य करत असतात,” असेही त्यांनी प्रतिपादित केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रेव्ह.रवि चांदेककर यांनी आपल्या भाषणात याजकीय सेवा करताना येणाऱ्या समस्या आणि देव देत असलेल्या आशीर्वादांचा विशेष उल्लेख केला.तसेच बिशप शामुएल भिंगारदिवे यांनी मनोगत व्यक्त करताना “देवाचा सेवक हा दुप्पट सन्मानास पात्र आहे,” असे विचार मांडले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पास्टर शरद,स्टेव्हन गेरे, ॲड.निलेश कर्डिले,रेव्ह.सुहेल त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान सी.एन.आय.,सॅल्व्हेशन आर्मी तसेच इंडिपेंडंट चर्चच्या आचार्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.सन्मानपत्र, ट्रॉफी,मेडल व शाल देऊन महाराष्ट्रातील एकूण ६० याजकांचा सत्कार अध्यक्ष, उद्घाटक तसेच प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या याजकांमध्ये या सन्मानामुळे नवा उत्साह दिसून येत होता.सत्कार समारंभानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी रेव्ह.मनोज शिरसाठ यांनी शेवटची प्रार्थना केली, तर रेव्ह.संदिप गंगादक यांनी आशीर्वाद दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन विशाल पटेकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉर्ज शिंदे,विक्रम गायकवाड, लूकस पाटोळे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
