Kotvali police..घर पाहण्याच्या बहाण्याने आला अन् मित्राच्याच घरातील ८ लाखाचे सोने चोरले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मित्राच्या घरात शिरून कपाटातील तब्बल ८ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकत १००% मुद्देमाल जप्त केला आहे.तक्रारदार श्रद्धा विठ्ठलराव जाधव (वय २९,रा. छत्रपती टॉवर,केडगाव) या नवीन घराची पाहणी करण्यासाठी बाहेर गेल्या असता,त्यांचा लहान मुलगा आणि बहीण घरात होते.या दरम्यान मुलाचा मित्र आरोपी विवेक विजय वहाडणे (वय २०,रा.अंबिकानगर,केडगाव) हा त्याच्या अल्पवयीन मित्रासह घरात आला व बेडरूममध्ये गेला.तक्रारदार घरी परतल्यावर कपाटाच्या ड्रॉव्हरमधील सोन्याची बांगडी (कडे) आणि खड्याची अंगठी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.विशाल चिटणीस व पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयित आरोपी विवेक विजय वहाडणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीकडून ५.५ तोळ्याचे सोन्याचे कडे (किंमत रु. ८,२५,०००/-) आणि २.५ ग्रॅमची सोन्याची अंगठी (किंमत रु. ३७,५००/-) असा एकूण ८ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, स.पो.नि.विशाल चिटणीस, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड,साबिर शेख,राहुल शिंदे, विनोद बोरगे,विशाल दळवी, शिरीष तरटे,सुरज कदम,संदीप शिरसाट,अतुल कोतकर,संकेत धिवर,रमेश शिंदे,अतुल लाटे,वैभव काळे आकाश काळे,सत्यम शिंदे,पूजा खांदवे दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू व अरुण सांगळे यांनी दिली आहे.
