संगमनेर पोलीस ठाण्यात होमगार्डकडून हेडकॉन्स्टेबलची मालिश;एसपींनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली तरी ‘त्या’ कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई नाही..
संगमनेर (प्रतिनिधी):-पोलीस ठाणे म्हणजे कायद्याचा धाक आणि शिस्तीचे ठिकाण;मात्र संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खाकी वर्दीलाच काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला आहे.चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच एका हेडकॉन्स्टेबलने बिचाऱ्या होमगार्डकडून अंगाची मालिश (मसाज) करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या ‘शाही’ मालिश प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (SP) गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असली,तरी संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथे संगमनेर तालुका पोलीस ठाणे कार्यरत आहे.
याच पोलीस ठाण्यात एका हेडकॉन्स्टेबलने खाकी वर्दीचा गैरवापर करत एका होमगार्डकडून चक्क मालिश करून घेतली.ठाण्यातच असा धक्कादायक प्रकार घडत असताना स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत होते. जेव्हा या ‘मसाज प्रकरणाचे’ फोटो बाहेर आले,तेव्हा पोलीस दलासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली.हे प्रकरण वृत्तपत्रांत झळकताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची तात्काळ गंभीर दखल घेतली.त्यांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि तात्काळ वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.मात्र,एवढा मोठा गदारोळ होऊन आणि वरिष्ठांनी ताशेरे ओढूनही पोलीस निरीक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.दरम्यान,तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी घडलेल्या अशाच विविध प्रकारांची माहिती आणि जुनी छायाचित्रे शोधण्याचा प्रयत्न काही कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत.मात्र, सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवणाऱ्या खाकी वर्दीत बसून स्वतःची सेवा करवून घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला स्थानिक पातळीवर पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.आता जिल्हा पोलीस अधीक्षक या मुजोर कर्मचाऱ्यावर नेमका काय बडगा उचलून होमगार्डला न्याय मिळवून देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
