दुष्काळाचे सावट असताना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मोठी मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यावर दुष्काळाचे सावट असताना अहिल्यानगर शहरात पिण्याच्या पाण्याची सर्रास नासाडी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.रस्त्यावर पाण्याचे सडे मारणे आणि नळाच्या पाण्यावर गाड्या चकाचक धुणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर महापालिकेने तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी,अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील विविध उपनगरे व उच्चभ्रू वसाहतींमध्ये दररोज सकाळी घरांसमोर पाण्याचे सडे शिंपडणे,अंगण धुणे आणि महागड्या गाड्या पाईप लावून धुण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.दुष्काळजन्य परिस्थितीची जाणीव करून देऊनही संबंधित नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार घटकांना चाप लावण्यासाठी महानगरपालिकेने विशेष भरारी पथके (Flying Squad) स्थापन करून थेट दंडात्मक कारवाई करावी, असा उपाय बोज्जा यांनी सुचवला आहे.राज्यातील अनेक प्रगत महापालिकांच्या धर्तीवर अहिल्यानगर शहरातही प्रत्येक नळ कनेक्शनला तातडीने ‘वॉटर मीटर’ बसवण्यात यावेत.
नागरिकांना ठराविक मर्यादेनंतर वापरलेल्या प्रत्येक थेंबाचा कर आकारला गेला, तरच पाण्याची उधळपट्टी थांबेल आणि पालिकेच्या तिजोरीत भर पडण्यासोबत पाण्याचीही मोठी बचत होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.शहरात अनेक ठिकाणी खासगी बोअरवेलमधून अहोरात्र पाण्याचा उपसा सुरू असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर खोल गेली आहे.या अनियंत्रित उपशावरही पालिकेने कडक नियमावली लागू करावी.तसेच,शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी लोकसहभाग वाढावा म्हणून ‘पाण्याची नासाडी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या दक्ष नागरिकाला योग्य बक्षीस’ जाहीर करावे,अशी नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचे आवाहनही श्रीनिवास बोज्जा यांनी आयुक्त महोदयांना केले आहे.महापालिकेने या संवेदनशील विषयावर तातडीने पावले न उचलल्यास भविष्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
