प्रतिनिधी(दि.१७ एप्रिल):-राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल स्थळी शनिवारी रात्री ७.३० वा. सुमारास एका व्यावसायिकास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून रोख रक्कम 70 हजार व 80 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चेन असा मिळून दीड लाखांचा ऐवज लुटण्याची घटना शहरात घडली आहे.याबाबत वाल्मीक शिवमूर्ती गोसावी(रा.टाक गल्ली,राहाता जि.अहमदनगर) यांनी राहता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील एसआरके फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी जिन्याने जात असताना दादा मोरे, अक्षय माळी,दोन्ही रा. राहाता,सोन्या पवार व प्रविण वाघमारे,दोन्ही रा.पिंपळस, ता.राहाता यांनी संगनमत करून माझ्याजवळ आले व त्यांनी मला घेरुन जागेवर थांबून दादा मोरे याने त्याचे कमरेचा कट्टा काढला व माझ्या पोटाला लावला डाव्या हाताने माझ्या उजव्या गालावर चापटीने मारून चल पैसे काढ,असे म्हणून माझ्या पॅन्टीच्या उजव्या खिश्यात डावा हात घालून खिश्यातील 70 हजार रुपये हे बळजबरीने काढून घेतले.तर प्रविण वाघमारे याने माझ्या गळ्याला कोयता लावून जर ओरडला तर इथेच तुझी मान कापून टाकील,असे म्हणून फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन सोन्या पवार याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.आता तू सरळ तुझ्या घरी जा.जर पोलिसांत तक्रार द्यायला गेला तर घरी येऊन तुझा कट्ट्याने मुडदा पाडू, अशी धमकी दिली.वाल्मीक गोसावी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. 221/2023 भादंवि कलम 394,323,504,506,34, शस्त्र अधिनियम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एक आरोपी पोलिसांनी पकडला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
