अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ जुलै):-नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे युवा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेत केलेल्या कामगिरीची दखल घेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली आहे.१७ व्या लोकसभेतील १० सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून जाहीर झालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार २५० नवोदित खासदारांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने बिर्ला यांनीही खासदार सुजय विखे यांचे विशेष कौतुक केले आहे.१७ व्या लोकसभेमध्ये २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.त्यापैकी मंत्री न झालेल्या २५० नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली.या सदस्यांपैकी खासदार विखे पाटील यांनी ४२६ तारांकित प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत आपले लक्ष वेधले आहे.जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार तारांकित प्रश्न,अतारांकित प्रश्न,चर्चासत्र आणि लोकसभेचे बिल अशा एकूण ५३१ वेळा त्यांच्या सहभागाची नोंद करण्यात आली आहे.लोकसभेच्या पार पडलेल्या ११ सत्रांमध्ये,सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला,तसेच विविध जनहिताच्या मुद्द्यांवर हस्तक्षेप आपली भूमिका ठामपणे मांडली.
