अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुलै):-पाथर्डी तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा जिरेवाडी शाळेमध्ये मुलांच्या शाळेत उपक्रमा बरोबरच सर्वांगीण विकासासाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी मुलांसाठी शाळेमध्ये शासनाची अतिशय महत्वाची मदतसेवा 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली.मुलांना या जीवनदायिनी सेवेची माहिती व्हावी आणि आपत्कालीन संकटकाळातही या सेवेबांबत मुलांना माहिती असावी यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक अण्णासाहेब साळुंके यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम घेण्यात आला.शाळेमध्ये आलेल्या रुग्णवाहिके बरोबर आलेले डॉक्टर संतोष तुपरे आणि रुग्णवाहिका पायलट ज्ञानेश्वर गोल्हर यांनी मुलांना अतिशय सोप्या शब्दात या सेवेची माहिती सांगितली तसेच मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संतोष तूपरे यांनी हसतखेळत दिली.यावेळी या दोन्ही पाहुण्यांचे शाळेकडून स्वागत व सन्मान करण्यात आला.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना दराडे आणि सहशिक्षक वसंत दहिफळे यांनी अमूल्य कष्ट घेतले.या उपक्रमांनंतर संपूर्ण जिरेवाडी गाव आणि परिसरात शाळेच्या या उपक्रमाची चर्चा दिसून आली.उपक्रमाची माहिती समजताच कोरडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी शाळा व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.
