वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्या चालकांना ९५ हजार ५०० रुपयांचा दंड;काळ्या काचांच्या विरोधात कठोर कारवाई होणार पोलीस निरीक्षक यादव
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२७ जुलै):-वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्या ११५ जणांवर कारवाई करण्यात आली असून,९५,५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.तसेच,विना नंबर वाहन, फॅन्सी नंबर प्लेट्सही पोलिसांच्या रडारावर असून पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत.कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्यांवर कोतवाली पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांची संख्या मोठी असल्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने कोतवाली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.वाहनांच्या समोरील आणि पाठीमागचे काच ही ७० टक्के आणि बाजूच्या काचा किमान ५० टक्के पारदर्शक असाव्यात असा केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात नियम 100 नुसार बंधनकारक आहे. काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये. लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या काढून टाकाव्यात,असे शासनाचे २० ऑक्टोबर २०१२ चे आदेश आहेत.परंतु अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून केला जातो.विशेषतःबेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा अशा काळ्या काचा करण्याकडे ओढा असल्याचे निदर्शनास येत आहे.अशा वाहन चालकांविरोधात कोतवाली पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कारवाई करत आहेत.१ मार्च ते २४ जुलै पावतो ११५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून,९५,५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.दंड आकारून सुद्धा काळ्या रंगाच्या फिल्म्स चालक काढत नसल्याने पोलिसांनी स्वतःच काचांवरील काळ्या फिल्म्स काढण्याची कारवाई सुरू केली आहे.तसेच, गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट्स लावणे, विना नंबरचे वाहन घेऊन फिरणे अशा वाहन चालकांवरही कारवाई सूरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस जवान श्रीकांत खताडे,रामदास थोरात,गुलाब शेख,मुकुंद दुधाळ,शिवाजी मोरे,अमोल गाडे,सुजय हिवाळे,अभय कदम,योगेश भिंगारदिवे,अतुल काजळे,सोमनाथ राऊत व इतर यांनी केली.
काळ्या काचांच्या विरोधात कठोर कारवाई होणार:पोलीस निरीक्षक यादव
चारचाकी वाहनांना काळ्या काचा गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी लावण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.विशेषत:अपहरण आणि चोरीसारख्या घटनांमध्ये वाहनांना काळ्या काचा असल्याचे पोलीस तपासात आतापर्यंत बऱ्याचदा उघड झाले आहे.त्यामुळे कोणत्याही वाहनावर अशा काचा आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.