अहमदनगर(२ ऑगस्ट):-चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन मोटरसायकल चोरांना विक्री करताना कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.शहरातील चाणक्य चौक व कोठी रस्त्यावरून दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून ६० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाणक्य चौकात व कोठी रस्त्यावर दोन इसम रविवारी (ता.३०) रोजी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाला पोलीस निरीक्षक यादव यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस अंमलदारांनी सापळा लावून चाणक्य चौकात चोरीची स्पेलंडर प्रो मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या वैभव सुरेश पठाडे (वय २६ वर्षे रा.आव्हाण खुर्द ता.शेवगांव जि.अहमदनगर) याला ताब्यात घेतले.तसेच कोठी रस्त्यावरून गणेश ढोल्या चव्हाण (वय ३८ वर्ष, रा.दुधसागर सोसायटी केडगाव,अहमदनगर) याला चोरीतील हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलसह ताब्यात घेतले.प्रत्येकी तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले असून,दोघांविरुद्ध मपोका कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी वैभव पठाडे याच्यावर कोतवाली तोफखाना आणि शेवगाव पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत तर गणेश चव्हाण याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे.पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोहेकॉ/गणेश धोत्रे, पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/ एपी.इनामदार,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/अमोल गाडे यांनी ही कारवाई केली.
