व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई करणार कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव;कोणालाही न घाबरता व्यापाऱ्यांनी तक्रार करावी
अहमदनगर (दि.१७ ऑगस्ट):-उद्योग व्यवसाय सांभाळत असताना कोणीही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड पोलीस चौकी सुशोभित करून पुन्हा सुरू करण्यात आली असून त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक यादव बोलत होते.मार्केटयार्ड परिसरातील पोलीस चौकी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली पोलीस चौकी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सूरू केली आहे. मार्केट यार्ड बीट करीता नेमलेले अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे चौकीमध्ये बसूनच कामकाज पाहतील. नागरिकांना सहजासहजी उपलब्ध राहतील. यावेळी पोलीस चौकीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी परिसरात किरकोळ चोऱ्यामाऱ्या बाबत व इतर मुद्द्यांवर माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना दिली. त्यावर मार्केट यार्ड परिसरात रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणार व कोणी त्रास देत असेल तर त्यांचाही बंदोबस्त करू असे आश्वासन यादव यांनी दिले. व्यापाऱ्यांना जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली कोणी पैशाची मागणी करीत असेल तर संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, राजेंद्र बोथरा, अविनाश घुले, गोपाल मणियार, अशोक लाटे अमोल पोखरणा, विजय कोथिंबीरे, विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, सुजित औसरकर, मुकेश शिंगवी, पिंटू थोरात, संदीप साबळे, संजय बोरा, गणेश गांधी, आनंद चोपडा, राजू गांधी, मिलिंद नेवासकर, शशी घिगे, पोलीस कर्मचारी योगेश खामकर, मच्छिंद्र पांढरकर तसेच इतर व्यापारी उपस्थितीत होते.
मार्केटयार्ड मध्ये कॅमेरे बसविणार
व्यापारी वर्गाच्या सुरक्षेसाठी मार्केट यार्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मार्केट यार्ड परिसरात लवकरच वर्गणी गोळा करून कॅमेरे बसविण्यात येतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.व्यापारी अमोल पोखरण यांनी स्वतःहून मार्केट कमिटी परिसरात पाच कॅमेऱ्यांचा संच देण्याचे मान्य केले.
कुणी त्रास दिल्यास पोलिसांना माहिती द्या
व्यसन करून कोणी व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीची तात्काळ माहिती कोतवाली पोलिसांना द्या, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करू, असे यादव यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक यादव यांच्या ७७७७९२४६०३ या मोबाईल क्रमांकावर तसेच कोतवाली पोलीस स्टेशनच्या नंबरवर फोन करून त्रास देणाऱ्याची तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले.