श्रीरामपूर (दि.27 ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून तालुक्यातील हरेगाव परिसरातील चार मुलांना सहा जणांनी आपल्या शेतातील विहिरीवर नेऊन अमानुषपणे अर्धनग्न करून बेदम मारहाण केली.
निर्दयी मारहाणीचे व्हिडिओ,फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी हरेगाव बंद ठेऊन घटनेचा निषेध केला.श्रीरामपूर शहरातही दलित संघटनांनी दिवसभर आंदोलने केली.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की,हरेगाव उंदिरगाव येथे शुक्रवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ दहाच्या सुमारास युवराज नाना गलांडे,मनोज बोडखे,पप्पू पारखे,दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य,राजू बोरगे
या सहा जणांनी शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील शुभम माघाडे, कुणाल मगर,ओम गायकवाड,प्रणय खंडागळे यांना गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले.तेथे त्यांना अर्धनग्न करून दोरीने पाय बांधून अमानुषपणे मारहाण केली.
