
लोणी (दि.१६ प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान,अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
“नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित,जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली.