
श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशिनकर):-श्रीरामपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने या शाळेत नुकताच माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.
माता पालक मेळाव्यानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम,बालआनंद बाजार,आरोग्याचे महत्त्व,व्यवसाय शिक्षण यावर मार्गदर्शन आदि कार्यक्रम संपन्न झाले.माता पालक मेळाव्याची सुरुवात सर्व मातांच्या हस्ते सरस्वती,जिजामाता,सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर माता भगिनींचा हळदी-कुंकू कार्यक्रम एकमेकींना वाण व तिळगुळ देऊन संपन्न झाला.महिलांची संगीत खुर्ची या मनोरंजनात्मक खेळाने खूपच रंगत आणली.यात शाळेतील शिक्षिका सुजाता सोळसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यानंतर बालआनंद बाजार भरविण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शेतातील आणलेला भाजीपाला,घरी बनविलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले.उपस्थित पालक,ग्रामस्थ व माता-भगिनींनी विविध खाद्यपदार्थ व भाजीपाल्यांची खरेदी केली.यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तूंची खरेदी – विक्री कशी करावी याबाबत व्यवहारज्ञान समजले.विद्यार्थ्यांनी विक्री केलेल्या वस्तुतून नफा मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व मातांना आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार,व्यायाम,चांगले विचार यांची सांगड असणे गरजेचे असल्याचे नमूद केले.तसेच माता पालक मेळाव्याचे सुंदर आयोजन केल्याबद्दल व शाळेच्या सुंदर वातावरणाबद्दल कौतुक केले.व्यावसायिक शिक्षणाबाबत प्रमोद शेजुळ यांनी मार्गदर्शन करताना छोट्या छोट्या व्यवसायातूनच प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो असे सांगून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची व प्रवेशाची ओळख करून दिली.
यावेळी कार्यक्रमास सरपंच राजाराम राशिनकर, उपसरपंच पुष्पाताई लांडे,बापूसाहेब लांडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,संपतनाना लांडे,दिपक राशिनकर,शिवाजी लहारे,अविनाश लांडे,प्रशांत लांडे तसेच मुक्ताबाई तुपे,पुजा दरेकर,राणी वाघ,अश्विनी सोमासे,स्वाती धसाळ,वैशाली लहारे,अनिता दातीर,संगीता दातीर,निशा लांडे,इंदुबाई लांडे, कमल दातीर,मंगल लांडे,उषा राशिनकर,अनिता लांडे,ज्योती गायकवाड,रुक्मिणी मोरे,सोनाली सोनवणे आदी माता भगिनी व ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी केले तर आभार शिक्षिका सुजाता सोळसे यांनी मानले.या स्तुत्य उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षणविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, केंद्रप्रमुख राजू इनामदार यांनी शाळेचे कौतुक व अभिनंदन केले.