
अहमदनगर (दि.२२ मार्च):-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एकास गांजा बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने रंगेहात पकडले आहे.आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना पोउपनि/धाकराव यांना दि. 21 मार्च रोजी गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे वैभव गायकवाड रा. वडारवाडी,देवळाली प्रवरा, ता.राहुरी याने एक गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने आणलेला असुन तो आज रोजी सदर गावठीकट्टा कोणाला तरी विक्री करणार आहे.आता गेल्यास तो गावठीकट्टयासह त्याचे राहते घरी मिळुन येईल अशी बातमी मिळाली.त्यानंतर पथकाने तात्काळ राहुरी पोलीस स्टेशन येथे जावुन राहुरी पो.स्टे.चे पोनि/संजय ठेंगे,पोउनि/समाधान फडोळ व स्टाफ तसेच पंच,साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी वडारवाडी,देवळाली प्रवरा, ता.राहुरी येथे जावुन संशयीत नामे वैभव गायकवाड याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, त्याचे राहते घराजवळ जावुन खात्री केली असता घराच्या बाहेर बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम उभा असलेला दिसला.
त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव सुनिल गायकवाड रा.वडारवाडी, देवळाली प्रवरा,ता.राहुरी असे असल्याचे सांगितले.त्याची व त्याचे राहते घराची झडती घेता त्याचे कब्जात गावठी कट्टा मिळुन आला नाही. त्यामुळे संशयीत वैभव गायकवाड याचे कडे गावठी कट्टयाबाबत विचारपुस केली असता त्याने मी गावठी कट्टा विक्री करत नाही असे सांगितल्याने पथकाचा संशय बळावला.पथकाने लागलीच संशयीताचे घराची झडती घेतली घरातील दिवाणचे कप्यात एका गोणीत ओलसर गांजा,बिया बोंड,काड्या व पाने संलग्न असलेल्या कॅर्नोबस या वनस्पतीचे शेंडे असे मिळुन आल्याने आरोपीस ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जातुन 58,250/- रुपये किंमतीचा गोणीतील 5 किलो 820 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पोहेकॉ/1293 गणेश प्रभाकर भिंगारदे नेम स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 300/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (ग), 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,डॉ.श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, रविंद्र कर्डीले,गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार,संतोष खैरे, विजय ठोंबरे,रणजीत जाधव, किशोर शिरसाठ,अरुण मोरे, अर्जुन बडे व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे यांनी केलेली आहे.