मृत SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोले (दि.२२ प्रतिनिधी):-सुगाव घटनेत मृत झालेल्या एस.डी.आर.एफ जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचकरा करीता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचे वृत्त समजल्या नंतर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, मा.आ.वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिका-यांनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेबाईक आणि त्याच्या सहका-यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला.
यासर्व जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहीती ना.विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यामध्ये बुडालेल्या अन्य दोन व्यक्तिंचा तपास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून, धरणातून पाण्याचा प्रवाहही आता बंद करण्यात आला आहे. याच कारणासाठी युवकांनी केलेल्या रस्ता रोको आंदोलनासही मंत्री ना.विखे पाटील यांनी भेट दिली. घटना घडल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सुचना आपण यापुर्वीच दिल्या होत्या परंतू आंदोलकांच्या भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्याच्या सुचना जलसंपदा विभागाला त्यांनी दिल्या.